⚡ ब्रेकिंग News

सराफ निलेश बाफना अटक नाशिक मध्ये 38 कोटींचा महाघोटाळा बाफना ज्वेलर्स प्रकरणाने खळबळ!

प्रवीण  कासार  :
नाशिकच्या सराफा बाजाराला हादरवून सोडणारा तब्बल ३८ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोन्या-चांदीच्या व्यापारातील विश्वासार्हतेवर आणि बँकिंग व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह? निर्माण करणाऱ्या या प्रकरणामुळे शहरभर मोठी खळबळ उडाली आहे.

शरणपूर रोडवरील प्रसिद्ध बाफना ज्वेलर्स या प्रतिष्ठानावर टीजेएसबी सहकारी बँकेच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाने कारवाई करण्यात आली. नाशिक शहर पोलिसांच्या उपस्थितीत दुकानाचे शटर उघडण्यात आले. मात्र आत दिसलेले चित्र पाहून अधिकारी आणि बँक प्रतिनिधीही अवाक् झाले.

दुकानात तब्बल ५९ कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे असल्याची नोंद कागदोपत्री करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष तपासणीदरम्यान केवळ सुमारे २५ लाख रुपयांची चांदी आढळून आली. उर्वरित कोट्यवधी रुपयांचा मौल्यवान साठा गायब असल्याचे समोर आले.

बँकेच्या माहितीनुसार, बाफना ज्वेलर्सच्या संचालकांनी २०१८ पासून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. सुरुवातीला नियमित परतफेड करून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ५९ कोटी रुपयांच्या मौल्यवान साठ्याची कागदपत्रे आणि स्टॉक स्टेटमेंट सादर करून तब्बल ४४ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करून घेण्यात आले.

मात्र मार्च २०२५ पासून कर्जाचे हप्ते आणि व्याज भरणे बंद झाल्याने बँकेचा संशय बळावला. त्यानंतर सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई सुरू करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार दुकानाची तपासणी केल्यानंतर कथित गैरव्यवहार उघडकीस आला.

या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश बाफना याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

कोट्यवधी रुपयांचे सोने आणि पैसा नेमका कुठे गेला? या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास युद्धपातळीवर सुरू असून नाशिकच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

*महाराष्ट्र माझा न्युज साठी नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी प्रवीण कासार नाशिक*

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...