⚡ ब्रेकिंग News

9 हजार रुपयाच्या वादातून मित्राचा खून ; मृतदेह पोत्यात भरून टेरेसवर लपवला, सातपूर पोलिसांनी अवघ्या १२ तासात लावलाय खूणाचा छडा!

संपादक :जनार्दन गायकवाड 

नाशिक शहरात खळबळ उडवणाऱ्या कामगारनगर येथील युवक हत्याकांडाचा अवघ्या 12 तासांत सातपूर पोलिसांनी छडा लावला आहे. इमारतीच्या टेरेसवर पोत्यात आढळलेल्या मृतदेह प्रकरणी एका 19 वर्षीय संशयिताला नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. 

नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगारनगर येथे घडलेल्या युवकाच्या हत्येचा उलगडा सातपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत केला आहे. मृत युवकाची ओळख वैष्णव मिलिंद शिंदे (वय 24) अशी झाली असून तो 20 जूनपासून बेपत्ता होता. 

21 जून रोजी कामगारनगर येथील एका इमारतीच्या टेरेसवर पोत्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत अज्ञात मृतदेह आढळून आला होता. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. 

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि मानवी तपास कौशल्याच्या आधारे कृष्णा राकेश दुसाने (वय 19, रा. कामगारनगर, सातपूर) याच्यावर संशय व्यक्त केला. तो मुंबईकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

पोलिसी चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली. मृत वैष्णव शिंदे याने आरोपीला दिलेले 9 हजार रुपये परत मागितले होते. याच पैशांच्या वादातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्याचा राग मनात धरून 19 जूनच्या मध्यरात्री आरोपीने धारदार चाकूने वैष्णवच्या छातीवर आणि गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. 

हत्या केल्यानंतर आरोपीने अत्यंत थंड डोक्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मृतदेह पोत्यात भरून दोन दिवस इमारतीच्या टेरेसवर लपवून ठेवला. मात्र मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. 

या प्रकरणाचा पुढील तपास सातपूर पोलीस करत असून आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...