प्रतिनिधी : प्रवीण कासार
नाशिकच्या पंचवटी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. खेळता-खेळता पाण्याच्या टाकीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मृत मुलींची नावे ८ वर्षीय वृत्ती सोनवणे आणि ५ वर्षीय स्वस्ती सोनवणे अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील एका घरात दोन्ही बहिणी खेळत होत्या. खेळत असताना काही वेळाने दोन्ही मुली अचानक दिसेनाशा झाल्या. बराच वेळ मुली दिसत नसल्याने त्यांच्या आईने त्यांचा शोध सुरू केला.
घरातील विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर आई पाण्याच्या टाकीजवळ गेली. टाकीचे झाकण उघडे असल्याचे दिसल्यानंतर आत पाहिले असता दोन्ही मुली पाण्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी धाव घेतली. मात्र दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
दोन्ही बहिणींवर पंचवटीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेप्रकरणी पंचवटी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे का होते आणि नेमक्या परिस्थितीत हा अपघात कसा घडला, याचा तपास पोलीस करत आहेत.
दोन चिमुकल्या बहिणींच्या अशा दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळला असून, पाण्याच्या टाक्या आणि धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Post a Comment