संपादकीय - जनार्दन गायकवाड
नाशिक : नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जबाबदार नागरिकांनी पोलिसांसोबत सक्रिय होणे आवश्यक आहे, शंभर टक्के गुन्हेगारी नियंत्रणात येईल, असे प्रतिपादन अंबड पोलिस स्टेशनचे व.पो.नि.प्रमोद वाघ यांनी केले.
शनिवार दि. १२ ऑगस्ट रोजी संविधानप्रेमी नाशिककर, भारतीय हितरक्षक सभा व एम्स फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने " वाढती गुन्हेगारी व कायदा आणि सुव्यवस्था " या महत्वपूर्ण विषयांवर नारायण सुर्वे वाचनालय, सिंहस्थ नगर, नवीन सिडको येथे जाहीर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी किरण मोहिते होते.
पो.नि. वाघ पुढे म्हणाले की, गुन्हा घडत असतांना नागरिक पहातात मात्र पंचनाम्याला समोर कुणी येत नाहीत. परिणामी पोलिस तपास पूर्ण ताकदीनिशी करता येत नाही आणि गुन्हेगार सुटतात. आज हा परिसंवाद आयोजित करून आयोजकांनी पोलिस खात्याला आश्वस्त केल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
सभाध्यक्ष किरण मोहिते यांनी आयोजकांच्यावतीने विचार मांडले की, संविधानप्रेमी नाशिककर गट शहरासोबतच एकूण समाजात शांतता अबाधित राहणेकामी प्रयत्नशील आहे. अलिकडेच इगतपुरी तालुक्यात माॅब लिंचिंगमधील मृत आणि गुन्हेगारांच्या कुटुंबियांना भेटून संवाद साधल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात विभागीय पोलिस ठाणे व पोलिस आयुक्तालय यांचेसोबत संवेदनशील, संविधानप्रेमी नागरिक यांना शांतता समित्यांमध्ये सामिल करून नागरिक प्रबोधन व सामाजिक सलोख्याचे प्रयत्न केले जातील.
यावेळी संतोष जाधव, अजमल खान, मनोहर आहिरे, डाॅ. अर्चना तोंडे, कल्याणी अनिता मनोहर, मौलाना सलीम खान, रेव्ह. गिरिष भालतिडक ,रवींद्र गायकवाड , ॲड.वायचळे, श्रावस्थी मोहिते, शरद जाधव आदींसह उपस्थित नागरिक महिला पुरूषांनी मत मांडले.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा शिंदे केले तर आभार प्रदर्शन अजमल खान यांनी मानले.




Post a Comment