⚡ ब्रेकिंग News

NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १६० कोटींचा शिक्षण घोटाळा! माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक, १२०० संस्थांवर संशय!

 
 प्रतिनिधी: प्रवीण कासार 
देशभरात नीट परीक्षेतील गैरव्यवहारामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले असतानाच महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राला हादरवणारा आणखी एक मोठा घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणात तब्बल १६० कोटी रुपयांच्या बनावट 'शालार्थ आयडी' घोटाळ्याचा तपास सुरू असून,
 या प्रकरणी जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर यांना धुळे येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

विशेष तपास पथक अर्थात SIT च्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२२ ते २०२५ या कालावधीत शशिकांत हिंगोणेकर यांनी कोणताही वैध प्रशासकीय प्रस्ताव नसताना २५१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या नावावर बनावट 'शालार्थ आयडी' तयार करण्यात आले आणि शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे वेतन व आर्थिक लाभ उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये एकूण ८५२ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केवळ कागदोपत्री असल्याचे आढळले आहे. कोणताही वैध नियुक्ती प्रस्ताव नसताना या व्यक्तींना वेतन मिळाल्याने शासनाची १६० कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. 

या प्रकरणात नाशिक रोड पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक, तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षक यांचाही सहभाग असल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, देशभरात सुरू असलेल्या NEET आंदोलनामुळे आधीच शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, महाराष्ट्रातील हा १६० कोटींचा शालार्थ घोटाळा शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून, सुमारे १२०० संस्थांचा सहभाग असल्याची माहितीही समोर येत आहे. या प्रकरणात आणखी कोणकोणती मोठी नावे समोर येतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...