नाशिक प्रतिनिधी:
मनपा प्रशासनाधिकारी श्री.बी.टी. पाटील यांच्या हस्ते हँगिंग लायब्ररी विद्यार्थीअर्पण कार्यक्रमाचे उद्घाटन.
नाशिक महानगर पालिका शाळा क्र .१८,आनंदवली येथील विद्यार्थ्याना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी येथील शिक्षक नेहमीच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. यामुळे शहरात ही शाळा नावारूपालाही आलेली आहे.
तंत्रज्ञानाच्या काळात पुस्तकांपासून दूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविण्यासाठी नुकताच या शाळेत एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला. शाळेतील उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव यानी आजवर समाज सहभागातून हजाराच्या वर अवांतर वाचनाची पुस्तके शाळेसाठी मिळविली आहेत.या पुस्तकांचा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास लाभ व्हावा, त्यांच्यातील वाचनाची गोडी वाढावी,वाचन कौशल्ये विकसित व्हावे म्हणून ही पुस्तके संपूर्ण शाळेत विद्यार्थ्याना पाहीजे तेव्हा, पाहिजे तेथे सहज उपलब्ध व्हावेत यावर त्या विचार करत होत्या व त्यातूनच त्यांना 'हँगिंग लायब्ररी' ची कल्पना सुचली. आपल्या वाढदिवशी त्यांनी विदयार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक प्रवासात कायम सोबत राहणारी भेटवस्तु देण्याचे अर्थात मनोरंजक,ज्ञानवर्धक पुस्तके समाविष्ट असलेली 'हँगिंग लायब्ररी' सुरु करण्याचे ठरवले.
नियोजनानुसार संपूर्ण शाळेत प्रवेशद्वारा पासून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत तारा लावून मुलांना त्यांच्या वयानुरूप आवडतील अशी विविध विषयांचे, विविध भाषिक, गोष्टींचे, विज्ञानाची बोधप्रद पाचशे पुस्तके त्यावर अडकवून सर्व विद्यार्थ्याना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली. शुक्रवार दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी श्री.बी.टी. पाटील साहेब यांच्या शुभहस्ते हँगिंग लायब्ररी च्या विद्यार्थीअर्पण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात श्री. पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या 'वाचाल तर वाचाल' या सुवचनाचा अर्थ व महत्व समजावत आपल्या शाळेत सुरू केलेल्या हँगिंग लायब्ररीचा उपयोग नियमितपणे करण्यासाठी विद्यार्थ्याना प्रोत्साहित केले व शिक्षकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास उपस्थित केंद्र प्रमुख तथा सत्यमेव पतसंस्थेचे चेअरमन सुनिल खेलुकर यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षिका सुरेखा घुमरे यांनी सूत्रसंचलन तर अनिता शिंदे यांनी मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख बाळासाहेब अहिरे, मुख्याध्यापिका वीणा देशमुख यांनी मार्गदर्शन तर सर्व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच हँगिंग लायब्ररी जवळ विद्याथ्यांची थबकलेली पावले व समोर दिसणारी छान छान पुस्तके हातात घेवून वाचनासाठी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी उत्सुकता व आनंद त्यांना आपल्या टीचरने दिलेली ही पुस्तकांची भेट खुपच आवडली हे दर्शवित होती.


إرسال تعليق