प्रतिनिधी: प्रवीण कासार
"देशातील चलन व्यवस्थेत मोठा बदल होणार का? ₹10 आणि ₹20 च्या प्लास्टिक नोटा बाजारात येणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. सोशल मीडियावर विविध दावे केले जात असताना, नेमकं सत्य काय आहे?
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI लवकरच ₹10 आणि ₹20 च्या पॉलिमर म्हणजेच प्लास्टिक नोटांची प्रायोगिक चाचणी सुरू करण्याच्या तयारीत आहे. या नोटांसाठी आवश्यक असलेल्या विशेष पॉलिमर शीट्स आणि सुरक्षा तंत्रज्ञानाच्या खरेदीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या नवीन नोटा साध्या कागदी नोटांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतील. त्या अधिक मजबूत, पाण्यापासून सुरक्षित आणि बराच काळ टिकणाऱ्या असतील. याशिवाय पारदर्शक सुरक्षा विंडो, आधुनिक सिक्युरिटी फीचर्स आणि अत्याधुनिक प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे बनावट नोटा तयार करणे अधिक कठीण होणार आहे. त्यामुळे नकली चलनावर मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये अशा पॉलिमर नोटा यशस्वीपणे वापरल्या जात आहेत. आता भारतातही त्याची चाचणी घेण्याचा निर्णय RBI ने घेतला आहे.
मात्र, एक महत्त्वाची बाब... सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक पोस्टमध्ये '₹10 आणि ₹20 च्या सध्याच्या नोटा बंद होणार' असा दावा केला जात आहे. हा दावा चुकीचा आहे. सध्या फक्त प्रायोगिक चाचणी होणार असून, विद्यमान कागदी नोटा तात्काळ बंद करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
चाचणी यशस्वी झाल्यानंतरच RBI पुढील निर्णय घेईल. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
"प्लास्टिक नोटा येणार की नाही... आणि आल्या तर त्या कधी येणार... याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. RBI च्या पुढील अधिकृत घोषणेकडे सर्वांच्या नजरा आहेत."
Post a Comment