निफाड तालुका प्रतिनिधी :- ( हेमंत जाधव )
शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हा बॅंकेविरोधात धरणे,वसुली न थांबविल्यास आंदोलनाची धार तीव्र
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या थकबाकीदारांवर केल्या जात असलेल्या जप्तीविरोधात शेतकरी एकवटले आहे. बुधवारी (दि. ५) येथील तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी धडक देत धरणे आंदोलन केले. वसुली न थांबविल्यास आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिन जप्तीच्या कारवाईविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्य शासनाने विशेष पॅकेज देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्ण कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेला विशेष पॅकेज द्यावे, शेतकऱ्यांचा ५ टक्के शेअर्स कपात केला असून, त्याचे व्याज शासनच जमा करते. 'र' कारवाईनुसार सातबारा उतार्यावर नावे लावण्याची कारवाई थांबवावी, कायद्यात नसलेला अनुषंगिक खर्च टाकला जात आहे. शेतमालास भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे या आंदोलनाची दखल न घेतल्यास गुरुवारपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष सुधाकर मोगल यांनी दिला.
शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान बोराडे म्हणाले, जिल्हा बँकेने आतापर्यंत १२०० शेतकऱ्यांच्या उतार्यावर नावे लावली आहे. सक्तीची वसुली कोणत्या कायद्यानुसार राबविली जात आहे, याचे उत्तर मिळावे, सावकारापेक्षाही बँकेची वसुली जाचक व तितकीच सुलतानी आहे. जिल्हा बँकेची अवस्था निफाड सहकारी साखर कारखान्यासारखी होऊ नये, अशी खंतही बोराडे यांनी व्यक्त केली. नांदुर्डी, दावचवाडी, रानवड, पालखेड व लोणवाडी येथे शेतकऱ्यांनी आम्ही नादार झालो, ही शपथ घेत घरी मरण्यापेक्षा सरकारी दरबारी उपोषण करुन मरु, असा निर्धार केला.
यावेळी शेतकरी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भगवान बोराडे, शेतकरी संघर्ष संघटना जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, शेतकरी संघर्ष संघटना निफाड उपतालुकाध्यक्ष संजय पाटोळे, शेतकरी समन्वय समिती सदस्य तुषार गांगुर्डे, बाळासाहेब ढोमसे, उमाकांत शिंदे, लक्ष्मण बर्वे, ज्ञानेश्वर शिंगाडे, विनायक घोलप, संजय झाल्टे, मोतीनाना पानगव्हाणे, साहेबराव मोरे, भाऊसाहेब भंडारे, दत्तात्रय सुडके, सोमनाथ झाल्टे, प्रभाकर बागुल, संजय पाटोळे, सचिन कड, नाना पठाडे, माणिक पगार, जगन्नाथ पगार, मनोहर ताकाटे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोषणा व फलकबाजीने वेधले लक्ष
शेतकरी संघर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली निफाड बसस्थानकासमोर शेतकरी जमा झाले. त्यानंतर शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करीत शेतकरी तहसील कार्यालयाकडे रवाना झाले. विविध घोषणाबाजी असलेल्या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Post a Comment