प्रतिनिधी: प्रवीण कासार
देशाच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर घडामोड समोर आली आहे. तामिळनाडूमधील भारतातील सर्वात मोठ्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित हजारो कागदपत्रे डार्क वेबवर अपलोड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात रिलायन्स समूहाने तृतीय-पक्ष सर्व्हरवरील 'पार्शियल डेटा ब्रीच' मान्य केले असून, केंद्र सरकार आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.
सायबर गुन्हेगारांच्या 'World Leaks' या रॅन्समवेअर गटाने कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित सुमारे 19 हजार कागदपत्रे डार्क वेबवर प्रसिद्ध केल्याचा दावा केला आहे. या कागदपत्रांमध्ये प्रकल्पाचे आराखडे, तपासणी अहवाल, पुरवठादारांची माहिती, विमा कागदपत्रे आणि इतर तांत्रिक माहिती असल्याचा दावा करण्यात आला आहे.
रिलायन्स समूहाने या प्रकरणात तृतीय-पक्ष डेटा सेंटर Yotta वरील सर्व्हरमध्ये अंशतः डेटा ब्रीच झाल्याचे मान्य केले आहे. कंपनीने ही घटना केंद्र सरकारला कळवली असून, भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक CERT-In आणि इतर यंत्रणा तपास करत आहेत.
दरम्यान, NPCIL ने स्पष्ट केले आहे की लीक झालेली माहिती अणुभट्टीच्या मुख्य सुरक्षा प्रणाली किंवा अणुसुरक्षेशी संबंधित नाही. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, सायबर सुरक्षेच्या दृष्टीने या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे.
कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित डेटा लीकचा दावा देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात रिलायन्सने डेटा ब्रीच मान्य केला असला, तरी अणुभट्टीच्या मुख्य सुरक्षा प्रणाली सुरक्षित असल्याचे अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आता तपासातून नेमका कोणता डेटा लीक झाला आणि त्यामागे कोण आहे, हे स्पष्ट होणार आहे.


Post a Comment